महर्षि शिंदे अध्यापक विद्यालय: माझी प्रेरणा

              लहानपणापासून माझे एक स्वप्न होते की आपण शिक्षक व्हावे,ज्ञानदानाचे कार्य करावे. माध्यमिक शिक्षण पूर्ण करीत असताना जेव्हा  घरात कुणी नसायचे, तेव्हा  मी शिक्षकाचा अभिनय करायचो आणि समोर विद्यार्थी बसले आहेत असं समजून त्यांना शिकवायचो. मला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की  मी बाळगलेले हे  स्वप्न 'महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय, नाशिक' यामुळे पूर्ण होऊ शकले. 
             माझा जन्म एका गरीब आणि अशिक्षित कुटुंबात  ब्राह्मणगाव, तालुका- सटाणा येथे झाला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते. आई अशिक्षित. परंतु तिने माझ्या मनात 'खूप शीक' अशी भावना निर्माण केली. सतत शिकण्याची प्रेरणा दिली. गावातील प्राथमिक शाळेत दाखल केले. मोलमजुरी करून तिने माझे d.ed पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
               'ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे', हा  सुविचार शाळेत असताना वाचायचो; पण त्याचा अर्थ समजण्याचे ते वय नव्हतं. वर्गात पहिले येण्याची भावना माझ्या मनात इयत्ता पाचवीत असताना निर्माण झाली. परंतु हे  माझे स्वप्न इयत्ता नववीत असताना पूर्ण झाले. इयत्ता नववीत मला 92%  मिळाले आणि संपूर्ण शाळेत मी प्रथम आलो. दहावीत  देखील मला 86 टक्के मिळाले आणि विद्यालयात प्रथम आलो. घरची परिस्थिती बेताची असल्याने मी कलाशाखेत प्रवेश घेतला आणि d.ed करण्याचे ठरवले. बारावीला कला शाखेत मला 80 टक्के गुण मिळाले. बोर्डात मी त्यावेळेला सातवा आलो होतो. दहावी आणि बारावी ला जास्त गुण असल्यामुळे माझा डीएडला सहज नंबर लागणार होता. अनेक लोकांनी मला सांगितलं की तू सायन्सला प्रवेश घ्यायला हवा होता. परंतु मी आधीपासूनच ठरवलं होतं  की मला प्राथमिक शिक्षक व्हायचंय. यादरम्यान माझ्या वाचनात लोकमान्य टिळकांचा एक विचार आला. जो मला खूपच भावला, “कोणत्याही क्षेत्रात जा, पण आपल्या कष्टाने त्या क्षेत्रात प्राविण्य आणि नावलौकिक मिळवा. जगातल्या कोणत्याही व्यवसायाला कमी मानू नका. प्रत्येक व्यवसाय हा सर्वश्रेष्ठ असतो." ह्या विचाराने मला उभारी दिली, प्रेरणा दिली. अल्लाद्दीनला जसा जादूचा दिवा सापडला, तसा माझ्यासाठी माझे जीवन बदलणारा जादुचा दिवा म्हणजे शाळा, शिक्षण आणि पुस्तके होय.  
             2000 मध्ये महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात d.ed साठी प्रवेश घेतला. गावापासून मालेगाव जवळ होते तेथे देखिल मला प्रवेश मिळाला असता; परंतु माझी महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात प्रवेश घेण्याची आधीपासूनच इच्छा होती. जिल्ह्यातील नामांकित अशा मराठा विद्या प्रसारक समाजाचे हे अध्यापक विद्यालय आहे. त्याचा अध्यापन क्षेत्रामध्ये खूप नावलौकिक आहे. उत्कृष्ट असा प्राध्यापक वर्ग, सुंदर अशी दगडी इमारत, प्रशस्त मैदान, हाकेच्या अंतरावरच वस्तीगृह आणि गोदावरी नदीचा नयन मनोहर परिसर अशी या विद्यालयाची वैशिष्ट्ये सांगता येतील. नाशिक मध्ये गंगापूर रोडवर अशोक स्तंभापासून अतिशय जवळच हे कॉलेज मविप्र समाजाच्या प्रांगणात वसलेल आहे.
             सध्या  मी सप्टेंबर 2016 पासून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नाशिक (DIECPD) येथे इंग्रजी विषयाचा 'राज्य साधन व्यक्ती' ( State Academic Resource Person) म्हणून काम करत आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देणे, इंग्रजी विषयाबद्दल शिक्षकांच्या मनातील भीती दूर करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, इंग्रजी विषयाच्या अध्यापनातील वेगवेगळ्या टेक्निक्स  शिकवणे, जिल्ह्यामध्ये इंग्रजी विषयाचे वातावरण तयार करणे आणि प्राथमिक शिक्षकांमध्ये इंग्रजी बोलण्याचे कौशल्य विकसित करणे, जेणेकरून मराठी विद्यार्थ्यांना, तळागाळातील विद्यार्थ्यांना 'वाघिणीचं दूध' असलेली ही इंग्रजी भाषा समजायला हवी, बोलता यायला हवी, एकविसाव्या शतकात त्यांना एक जबाबदार नागरिक म्हणून जगाला सामोरे जाता यायला हवं, नवीन आव्हाने पेलता यायला हवीत, हे ध्येय समोर ठेवून काम करीत आहे. 
           आज माझ्या जीवनात जे काही यश वाट्याला आले आहे, याची पायाभरणी महर्षि शिंदे ded विद्यालयाने केली आहे. माझ्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचे कार्य इथल्या अध्यापक वर्गाने केले आहे. यशस्वी होण्यासाठी नुसतेच मार्कशीट मधील गुण उपयोगी नसतात, वर्गात आलेला प्रथम क्रमांक महत्वाचा नसतो, नुसतीच घोकंपट्टी उपयोगी नसते तर आपल्यामध्ये कौशल्यांचा विकास होणे गरजेच असतं. 'कौशल्यपूर्ण शिक्षण हीच खरी ज्ञानाची शिदोरी' हा विचार या विद्यालयाने माझ्यावर बिंबवला. शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य विकसित करणारी प्रशिक्षण संस्था, छात्राध्यापकांना सर्वांगीण विकासास मदत करणारी ज्ञान शाळा म्हणजे महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय. वेगवेगळे उपक्रम राबवणारे हे अध्यापक विद्यालय जिल्ह्यातील शिक्षकांना सेवापूर्व आणि सेवांतर्गत प्रशिक्षण देणारी एक नामांकित अशी प्रशिक्षण संस्था आहे.
              शिक्षक होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य, भाषण कौशल्य असणे आवश्यक आहे, हे या महाविद्यालयाने आम्हाला शिकवले. 40 ते 50 मुलांमध्ये बोलणं वेगळं आणि 40 ते 50 मुलांसमोर अभ्यासपूर्ण बोलता येण  वेगळं यात खूप फरक आहे. माझ्या मनात सुरवातीला आत्मविश्वासाचा अभाव होता, बोलण्याचे धाडस होत नसायचं, वर्गात मित्रांसमोर परिचय देताना सुद्धा मी घाबरायचो. सुरवातीलाच आमच्या गणिताचे शिक्षक असणाऱ्या गांगुडे सरांनी मला परिचय देण्यासाठी उभ केलं, आणि त्यांनी मला तोच परिचय किमान सहा ते सात वेळा द्यायला लावला.  माझ्या बोलण्यातली अस्पष्टता,उडालेली घाबरगुंडी ही त्यांच्या सहज लक्षात येत होती.
मी ठरवले की मला बोलता यायला पाहिजे. मला उत्कृष्ट भाषण देता आलं पाहिजे. मला परिपाठात गोष्ट सांगता आली पाहिजे. मला समूहगीत गाता आलं पाहिजे.  विद्यालयात अनेक उपक्रम असायचे आणि या सर्व उपक्रमात प्रत्येकाने आवर्जून भाग घेणे हे बंधनकारक असायचं. प्रत्येकालाच या सर्व कार्यक्रमात सहभाग घेऊन तयारी करणे अनिवार्य होते. इथला एक दैनंदिन कार्यक्रम असायचा आणि तो म्हणजे समूहाने परिपाठ सादर करणे. सूचना देणे, राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, बातमी वाचन,बोध कथा कथन, समूहगीत गायन इत्यादी कृती परिपाठात सादर कराव्या लागायच्या. समूहातील सर्व मित्र प्रत्येक कृती विभागून घ्यायचे. सर्वजण कसून तयारी करायचे आणि आपला परिपाठ हा सर्वांग सुंदर कसा होईल याकडे लक्ष द्यायचे. यातूनच माझा सभाधीटपणा विकसित व्हायला लागला. आत्मविश्वास दुणावला, बोलण्यामध्ये स्पष्टता यायला लागली, भाषण कौशल्य विकसित व्हायला लागलं. या सामूहिक कृतीतून आमच्यामध्ये  21st Century skills (co-operation and collaboration skills)  विकसित व्हायला लागले.
विद्यालयांमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, स्पर्धा व्हायच्या. मी आवर्जून वक्तृत्व स्पर्धा मध्ये सहभागी व्हायला लागलो. भाषण कौशल्य, सभाधीटपणा, आत्मविश्वास, विषयाचा सखोल अभ्यास इत्यादी गोष्टी माझ्यात विकसित व्हायला लागल्या.  जेव्हा मी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करायला लागलो, तेव्हा या गोष्टीचा मला प्रचंड असा फायदा झाला.
            छात्राध्यापक कार्यकालात शाळेत जाऊन वर्गावर पाठ घेणे हे एक मोठे दिव्य असायचे. त्यासाठी सर्वप्रथम विषयाचा घटक निवडणे, पाठाचे टाचण तयार करणे, प्राध्यापकांकडून तपासून घेणे, त्यात फेरबदल करणे, पाठाला अनुसरून असे शैक्षणिक साहित्य तयार करणे, आणि वर्गावर जाऊन पाठ घेणे ह्या बाबी स्वतःला शिक्षक म्हणून सिद्ध करणाऱ्या होत्या. आपल्या पाठ टाचणावर  जेव्हा अ + असा शेरा मिळायचा तेव्हा आनंद मात्र गगनात मावेनासा व्हायचा. पाठाचे टाचण तयार करणे, घटकांचा आणि उपघटकाचा अभ्यास करणे, त्यातील संबोध समजून घेणे, नवीन शब्दार्थ समजणे, अध्यापन पद्धतीचा वापर करणे, फलक लेखनाची तयारी करणे, विद्यार्थ्यांच्या वयानुरूप भाषेचा वापर करणे, शैक्षणिक साहित्याचा वापर करून शिकवणे आणि शिकवलेला  भाग मुलांना कितपत समजला हे जाणून घेण्यासाठी मूल्यमापन आणि उपयोजन यावर आधारित  प्रश्न विचारणे इत्यादी शिक्षणशास्त्रामधील बारकाव्यांचा विकास माझ्यात झाला.
                 या अर्थाने अध्यापक विद्यालय म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवणारी शाळाच होय.
इथला प्राध्यापक वर्ग म्हणजे ही एक संस्काराची शिदोरीच होती. माणूस हा अनुकरणातून सर्वाधिक जास्त शिकतो. आपल्या गुरु मध्ये जे उत्कृष्ट गुण असतात, तेच आपल्यामध्ये रुजतात. एखाद्या गोष्टीचा चिकित्सकपणे विचार कसा करावा, हा  संस्कार श्री गांगुर्डे सर यांनी दिला. आपल्या विद्यार्थ्यांना शिस्त लावन्यासाठी कधी कधी कठोरपणा अंगी बाणगावा लागतो याचे उदाहरण म्हणजे श्री. भागवत सर. एकदा ते द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रयोग शाळेत शिकवत होते. मी तेव्हा प्रथम वर्षाला होतो. मला त्यांच्याशी बोलायचे होते. मी न विचारताच आत शिरलो आणि त्यांच्याशी बोलायला लागलो. संपूर्ण वर्ग त्यामुळे डिस्टर्ब झाला होता. त्यांनी मला बाहेर घालविले आणि परवानगी घेऊन वर्गात यावयास सांगितले. या घटनेचा परिणाम असा झालाय की आजही मी कोणत्याही कार्यालयात अथवा वर्गात गेलो की सर्वात प्रथम मी विचारतो, "May I come in, Sir ?"
               काही शिक्षकांशी भावनिक नाते निर्माण झाले आणि ते आजही कायम आहे. त्यात विशेष करून श्री.काळोगे सर यांचा उल्लेख करावासा वाटतो. त्यावेळी आम्हाला शिकवणारे श्री.आहेर सर, श्री.श्याम पाटिल सर,श्री.पेखले सर, सौ बोडके मॅडम, सौ हांडगे मॅडम, सौ पूरकर मॅडम, जाधव सर, हांडगे सर ह्या सर्वच व्यक्ती आजही स्मरणात आहेत. ह्या काळात मिळालेले मित्र यांना मी कधीच विसरु शकत नाही. रवी पवार, किशोर देवरे, इमरान पठान, महेंद्र भामरे, महेश सोनार, तुकाराम वाजे, दीपक सहाने, हेमंत बेनके, बाबूराव सांगळे, रामनाथ सानप, राजू पवार, शरद कांगने, अतुल आहेर, विनोद शिंदे, देवीदास वाघ, उगले, हिरामन झिरवाळ, सविता गायधनी, गीतांजली, स्वाती, उत्कर्षा या सर्वाबद्दल माझ्या मनात आजही कृतज्ञता आणि आपुलकीची भावना आहे. मानवी जीवन घडणीत जसा आईवडील, शिक्षक यांचा सहभाग असतो, तसाच मित्र मैत्रिणींचा देखील मोलाचा वाटा असतो. 
             २००३ साली महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात ७५% गुण मिळवून मी प्रथम आलो. पण ह्या वेळी माझ्यात कुशलतेचा विकास  झालेला होता. २००४ मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या 'न्यू इंग्लिश स्कूल, दापूर ' येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. त्यानंतर २००५ मध्ये मी जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत  जि.प.प्राथ. शाळा, भावली खु. (इगतपुरी) येथे शिक्षणसेवक म्हणून कार्याला सुरुवात केली. आदिवासी मुलांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ब्रिटीश कौन्सिल सोबत २०१२-१३  मध्ये ELIPS ( English language initiative for  Primary Schools) याअंतर्गत शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम केले. २०१६ मध्ये  महाराष्ट्र शासन, ब्रिटीश कौन्सिल आणि टाटा ट्रस्ट यांच्या  'तेजस' ह्या महत्वाकांशी प्रकल्पात SARP
 (State Academic Resource Person) म्हणून निवड होऊन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नाशिक (DIECPD) येथे प्रतिनियुक्तीने कार्यरत आहे.  तेजस प्रकल्पात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे एप्रिल २०१८ मध्ये  BRIGHTON, UK येथे पार पडलेल्या  ५२व्या IATEFL (International Association of Teachers of English as a Foreign Language) आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपस्थित राहणेसाठी निवड झाली. राज्यात प्राथमिक शिक्षण क्षेत्रात इंग्रजी अध्ययन-अध्यापनाचा दर्जा विकसित होण्यासाठी तेजस, महातेजस, स्पोकन इंग्लिश आणि अडवान्सड स्पोकन इंग्लिश ह्या कार्यक्रमांची अंमलबजावणी होत आहे. या सर्व उपक्रमांत माझा सहभाग आहे. याचा आपल्या सर्वाना सांगण्यास खूप अभिमान वाटतो. 
     शेवटी माझे ध्येय हे 'रॉबर्ट फ्रॉस्ट' यांच्या कवितेसारखेच आहे.
     "Woods are lovely, dark and deep
     I've promises to keep
    And miles to go,
    Before I sleep ...."
                                            - Robert Frost


अशोक चंद्रभान चव्हाण
राज्य साधन व्यक्ती (SARP), 
DIECPD, Nashik
ashok30chavan@gmail.com
9763102742/9021623632
Twitter handle: @ashok30chavan




Comments

  1. खुप छान व्यक्त झालास अशोक .....खुप प्रगती केलीस....अजून कर....माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्यासोबत आहेत.....

    ReplyDelete
  2. अशोका सुंदर झाला लेख !

    ReplyDelete
  3. अशोक खुप छान लेख 👌👍

    ReplyDelete
  4. अशोकराव म्हणजे... यथार्थ लेखन ॥

    ReplyDelete
  5. खुपच छान,सर ..

    ReplyDelete
  6. खूप सुंदर लेख दादा!महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात शिकल्याचा अभिमान वाटतो!!👍

    ReplyDelete
  7. मनातील भाव व्यक्त करण्यासाठी शब्दरचना यांची साथ मोठी असते. ती प्रत्येकालाच जमते असे नाही.पण मनातील भाव प्रकट करण्याची दाट इच्छा असल्यास ती आपोआपच येते. खडतर जीवनाचा प्रवास अधोरेखित करणे हे खरंच धाडसाचे काम. सलाम आपल्या प्रवासाला. यात आपल्या जीवनात आपण अत्युच्च शिखरे सर करावीत ही मनपूर्वक इच्छा. आपल्या सोबतीने काम करताना एक मार्गदर्शक व मोठ्याभावाची साथ लाभली हे भाग्यच आमचे.

    ReplyDelete
  8. खूपच छान लेख मित्रा.

    ReplyDelete
  9. अशोकदादा ,संघर्षमय जीवन गाथा वाचून खूपच प्रेरणा मिळाली.आयुष्यात आपण खूप काही मिळवलं.पण तरीही तुम्ही आजही सर्वांसोबत आहात.इंग्लिश च्या प्रशिक्षणात आम्ही तुमच्यामुळे आलो.आणि खूप काही शिकलो.

    ReplyDelete
  10. Ashok Da
    This is one of the great achievement .A journey from Brhamangaon to UK , really amazing.

    अशोक दा
    या भारत मातेची आपल्या सर्वांवर खूप मोठी जबाबदारी आहे, तुम्ही स्वतः खूप समर्थपणे हे पेलवत आहात.

    लोकांना जिद्द, चिकाटी,मेहनत या बाबींचे उदाहरणे शोधावी लागतात, You are inbuilt an ideal example of achieving success. And Be a successful life.

    Best wishes to you.


    -------Sujitkumar Desale

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Heart attack