महर्षि शिंदे अध्यापक विद्यालय: माझी प्रेरणा
लहानपणापासून माझे एक स्वप्न होते की आपण शिक्षक व्हावे,ज्ञानदानाचे कार्य करावे. माध्यमिक शिक्षण पूर्ण करीत असताना जेव्हा घरात कुणी नसायचे, तेव्हा मी शिक्षकाचा अभिनय करायचो आणि समोर विद्यार्थी बसले आहेत असं समजून त्यांना शिकवायचो. मला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की मी बाळगलेले हे स्वप्न 'महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय, नाशिक' यामुळे पूर्ण होऊ शकले. माझा जन्म एका गरीब आणि अशिक्षित कुटुंबात ब्राह्मणगाव, तालुका- सटाणा येथे झाला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते. आई अशिक्षित. परंतु तिने माझ्या मनात 'खूप शीक' अशी भावना निर्माण केली. सतत शिकण्याची प्रेरणा दिली. गावातील प्राथमिक शाळेत दाखल केले. मोलमजुरी करून तिने माझे d.ed पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 'ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे', हा सुविचार शाळेत असताना वाचायचो; पण त्याचा अर्थ समजण्याचे ते वय नव्हतं. वर्गात पहिले येण्याची भावना माझ्या मनात इय...